कोरडवाहू शेतीमधील तण व्यवस्थापन

पीक उत्पादनात घट आणणा-या अनेक बाबी आहेत. त्यापैकी महत्त्वाची व मुख्य बाब म्हणजे तणांचा प्रादुर्भाव ही होय. खरीप पिकात तणांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो. त्या मानाने रबी पिकांत तणांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. अभ्यासाअंती असे दिसून आले की, सर्वसाधारणपणे पिकांच्या उत्पादनात तणामुळे 37 टक्के घट आढळून येते.

यावरुन स्पष्ट होते की, तणांचा योग्य वेळी व योग्य पध्दतीने बंदोबस्त केला नाही तर उत्पादनात मोठया प्रमाणात घट येते. त्यासाठी पीक उत्पादनामध्ये तणांचे नियंत्रण ही महत्त्वाची बाब ठरते. विशेषत: कोरडवाहू शेतीमध्ये तण व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध अन्नद्रव्ये पिकांसाठी महत्त्वाची ठरतात आणि नेमके या दोन बाबींसाठी तणांमुळे स्पर्धा निर्माण होते आणि त्याचा पिकांची वाढ व उत्पादन यावर परिणाम होतो. तणांची पिकांना जमिनीतील ओलाव्यासाठी होणारी स्पर्धा व त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान व उत्पादनातील घट ही कोरडवाहू शेतीमध्ये मोठया प्रमाणात दिसुन येते. तणयुक्त पिकांमध्ये ओलाव्याच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे तणमुक्त पिकांपक्षा लवकर व अधिक प्रमाणात दिसुन येतात.

थोडक्यात तणांमुळे पीक उत्पादनात पुढील प्रमाणे घट येते. उदा.

अ.क्र पीक उत्पादनात येणारी घट (%)
1. खरीप ज्वार 40%
2. कापूस 60% पर्यंत
3. साळ (ओलीत) 71% पर्यंत
4. बाजरी 30%
5. सूर्यफूल 30%
6. तूर 55%
7. सोयाबीन 53%
8. पुर्वहंगामी भुईमुग 70%
9. ऊस 60%

पिकांमध्ये महत्त्वाची आढळुन येणारी / वाढणारी तणे

1.एकदलवर्गीय : शिप्पी, भरड, घोडकात्रा, पंदाड, हराळी, कुंदा, लव्हाळा, विंचु, चिमणचारा.

2.द्विदलवर्गीय : दिपमाळ, दुधी, माठ, कुंजरु, काटेमाठ, माका, हजारदाणी, तांदुळजा, पेटारी, रानताग, उंदीरकाणी, शेवरा-शेवरा, चिकटा, रानएरंडी, गाजरगवत, बरबडा, कुरडू, टाळप, पाथर, चांदवेल,चंदनबटवा इ

तण नियंत्रणाच्या पध्दती:

1.प्रतिबंधात्मक उपाय     2.निवारणात्मक उपाय

1)प्रतिबंधात्मक उपाय

-प्रसार रोखणे

2)निवारणात्मक उपाय

-मशागतीय पध्दत
-यांत्रिक पध्दती
-जैविक पध्दत
-रासायनिक पध्दत

एकात्मिक तण व्यवस्थापन

परिस्थितीनुसार योग्य वेळी, प्रभावी, किफायतशीर व पर्यावरणास अनुकसानकारक तण नियंत्रणासाठी वरील पैकी दोन किंवा अधिक तणनियंत्रण पध्दतीची सांगड घालुन तण नियंत्राण करता येते.

1 . ज्वारी

ट्राझीन 0.50 किलो (क्रियाशील मात्रा) / हेक्टरी (1.0 कि/हे: व्यापारी मात्रा ) पेरणी नंतर पीक व तणे उगवणीपुर्वी + 6 आठवडयांनी कोळपणी व खुरपणी (गरजेनुसार).

2. बाजरी (हलकी जमीन) :

ट्राझीन (क्रियाशील मात्रा ) 0.25 किेलो / हेक्टरी (500 ग्रॅम / हे: व्यापारी मात्रा ) पेरणीनंतर पीक व तणे उगवणीपुर्वी + 6 आठवडयांनी कोळपणी व खुरपणी (गरजेनुसार)

3. सोयाबीन (हलकी जमीन ) :

ॲलाक्लोर 4 लिटर (व्यापारी मात्रा ) / हेक्टरी किंवा पेड्डामिथॅलिन 0.75 किलो / हेक्टरी (क्रियाशील मात्रा ) 750 लिटर पाण्यात पेरणी नंतर परंतु पिक व तणे उगवणीपूर्वी फवारणी व फवारणी नंतर निंदणी आणि कोळपणी 6 आठवडयांनी (गरजेनुसार) करावी.

4.तूर (हलकी जमीन) :

मेटाल्याक्लोर 1.0 किेलो /हेक्टरी (क्रियाशील मात्रा) (2.0 लिटर / हे: व्यापारी मात्रा ) पेण्डामिथॅलिन 0.75 किलो / हेक्टरी (क्रियाशील मात्रा ) (2.5 लिटर / हे: व्यापारी मात्रा ) 750 लिटर पाण्यात पेरणी नंतर परंतु पिके व तणे उगवणी पुर्वी फवारणी व फवारणी नंतर निंदणी आणि कोळपणी 6 आठवडयांनी (गरजेनुसार ) करावी.

5. कापूस :

पेण्डामिथॅलिन 0.75 किलो / हेक्टरी (क्रियाशील मात्रा ) (2.5 लिटर / हे : व्यापारी मात्रा) 750 लिटर पाण्यात पेरणी / लागवड नंतर परंतु पिक व तणे पुर्वी फवारणी नंतर निंदणी आणि खोळपणी 6 आठवड्यांनी करावी. उगवणपूर्व तणनाशकांचा वापर न करता आल्यास पुढे कापसामध्ये द्विदलवर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी उगवण पश्चात तण नाशकांचा व्यापर करता येतो. यामध्ये पायरिथायोबॅक सोडियम या तणनाशकाचा वापर 625 मिली / हेक्टरी (व्यापारी मात्रा ) + एकदली वर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी क्युझॉलफॉप इथाईल या तणनाशकाचा वापर 500 मिली/ हेक्टरी (व्यापारी मात्रा ) 500 ते 750 लिटर पाण्यात मिसळुन (तणे 2 ते 4 पानावर असताना ) तणांवर फवारणी करावी.

6. हरभरा:

हरभरा पिकात पेरणीनंतर पीक व तणे उगवणीपूर्वी पेण्डामिथॅलिन 0.75 किलो / हेक्टरी (क्रियाशील मात्रा) (2.5 लिटर / हे : व्यापारी मात्रा) 750 लिटर पाण्यात पेरणी नंतर पिक व तणे उगवणी पूर्वी फवारणी व फवारणी नंतर निंदणी आणि खोळपणी 6 आठवडयांनी (गरजेनुसार) करावी.

7. करडई :

करडई पिकात पेरणीनंतर परंतु पीक व तणे उगवणीपुर्वी पेण्डामिथॅलिन 0.75 किलो / हेक्टरी (2.5 लिटर / हे: व्यापारी मात्रा) किंवा ऑक्सिप्लोर फेन 0.1 किलो हेक्टरी (425 मिली / हे: व्यापारी मात्रा ) 750 लिटर पाण्यात पेरणी नंतर परंतु पिक व तणे उगवणी पुर्वी फवारावी व फवारणी नंतर निंदणी आणि कोळपणी 6 आठवडयांनी (गरजेनुसार) करावी.