कोरडवाहू शेतीसाठी फायदेशीर पीक पध्दती

महाराष्ट्रामध्ये सुमारे 80 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. कोरडवाहू शेतीतील उत्पादनाचा वाटा सुमारे 40 टक्के आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. जमीन आणि पाणी या नैसर्गिक घटकांचा पुरेपूर आणि परिणामकारकरित्या फायदा करुन घेणे हे कोरडवाहू शेतीतील महत्त्वाचे सूत्र आहे. त्या दृष्टीकोनातूनच कोरडवाहू शेतीत निव्वळ एकच पीक न घेता मुख्य पिकाबरोबरच एक अथवा दोन आंतरपिके शास्त्रोक्त पध्दतीने घेणे फार महत्वाचे आहे.


आंतरपीक पध्दती म्हणजे काय :

एकाच जमिनीवर एकाच हंगामात / वर्षात मुख्य पिकाबरोबर एक किंवा दोन पिके विशिष्ठ रचनेद्वारे घेण्याच्या पध्दतीला आंतरपिक पध्दती म्हणतात.


आंतरपीक पध्दतीचे फायदे :

* पावसाच्या अनिश्चित वितरणामुळे मुख्य पिकाची वाढ व उत्पादन बिघडल्यास आंतरपिका पासून निश्चित उत्पादन मिळते.

* सतत बदलणा-या लहरी हवामानाचा पिकावरील अनिष्ट परिणाम टळून हमखास काही तरी उत्पादन शेतक-याच्या पदरी पडते.

* रोग आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे मुख्य पिकास नुकसान पोहचल्यास आंतरपिकापासून शेतक-याला माफक प्रमाणांत निश्चित उत्पादन मिळते.

* आंतरपिके प्रामुख्याने कडधान्य वर्गात मोडत असल्यामुळे या पिकापासून जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम होते. विभिन्न कडधान्यापासून 20 ते 40 किलो नत्र प्रति हेक्टरी जमिनीमध्ये गाडले जाते. पर्यायाने कडधान्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक, आणि जैविक गुणधर्म सुधारतात.

* आंतरपिके लवकर तयार होणारी असल्यामुळे त्यापासून मिळणारा पैसा शेतक-यांना गरजेनुसार खर्च करता येतो.

* आंतरपिके पसरट व बुटकी असल्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन जमिनीची धूप कमी होते.

* एकंदरीत आंतरपीक पध्दतीमुळे अधिक उत्पादन, स्थर उत्पादन आणि जास्त नफा मिळून शाश्वत शेतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो.

वरील फायदे लक्षात घेता मागील पंधरा वर्षापासून कोरडवाहू परिस्थितीत योग्य आणि फायदेशीर पीक पध्दती शोधून काढण्याविषयीचे संशोधन करण्यात आले आहे आणि बदलत्या हवामानानुसार हे संशोधनाचे कार्य सतत चालू आहे.


आंतरपीक पध्दतीमध्ये मुख्य आणि आंतरपिकाची योग्य निवड

जमीन, हवा, पाणी, प्रकाश, अन्नद्रव्य या नैसर्गिक घटकांचा समतोल आणि परिणामकारकरित्या उपयोग होण्यासाठी मुख्य आणि आंतरपिकाची योग्य निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी विचारात घ्याव्यात.

* मुख्य पीक आणि आंतरपिकाची अंतरपीकांच्या मुळाच्या कायीक वाढीची वैशिष्ट्ये भिन्न असावी. उदा. मुख्य पिकाची वाढ उभट असल्यास आंतरपीक पसरट आणि बुटके असावे.

* मुख्य आणि आंतरपिकाच्या पक्वतेच्या कालावधीत योग्य फरक (20-30दिवसांचा) असावा. ज्यामुळे दोन्ही पिकाच्या वाढीच्या अवस्था भिन्न राहून उत्पादन वाढीच्या सर्व घटकांचा फायदा दोन्ही पिकास मिळतो.

* मुख्य आणि आंतरपिकाची मुळ संस्था शक्यतो भिन्न असावी. मुख्य पिकांची मुळ संख्या तंतुमय असल्यास आंतरपिक शक्यतो सोटमुळ संस्थेचे असावे.

* मुख्य आणि आंतरपीक एकमेकास स्पर्धक नसावेत ते एकमेकास पूरक असणे जरूरीचे असते.

* आंतरपिके ही प्रामुख्याने कडधान्य वगातील असावीत.

* मुख्य आणि आंतरपिकाच्या आंतर्भावामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत व्हावी.

* सूर्यफुलासासखे खादाड पीक आंतरपीक म्हणून घेऊ नये.

या सर्व शास्त्रोक्त बाबींचा विचार करुन काही निवडक फायदेशीर पीक पध्दती कोरडवाहू शेतीसाठी शिफारस करण्यात आल्या आहेत.

ह्या आंतरपिक पध्दत शास्त्रोक्त कशा घ्याव्यात या बाबतचा तपशील आंतरपीक पध्दती निहाय देण्यात येत आहे.


1 . ज्वारी + तूर :

ज्वारी + तूर ही आंतरपीक पध्दती कोरडवाहू शेतक-यांसाठी वरदानच ठरलेली आहे. ही आंतरपीक पध्दत 3:3 अथवा 4:2 ओळीच्या प्रमाणात शिफारस करण्यात आलेली आहे. ज्वारी आणि तूर सर्व दृष्टीने एकमेकास पूरक आहेत. ज्वारीचे पीक 110 ते 115 दिवसात निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्य तुरीच्या पिकास मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. हवा आणि भरपूर प्रकाश यामुळे तुरीचे पीक सलग पिकापेक्षाही जोमदार येऊन मोठया प्रमाणात उत्पादन मिळते. तूरीवरील शेंगा पोखरणा-या आळीचा प्रादुर्भाव या आंतरपीक पध्दतीत कमी प्रमाणात होतो असे आढळून आले आहे. ही एक स्वंयचलित फेरपालट होणारी आंतरपीक पध्दती असून एकाच शेतामध्ये आपाल्याला गरज पडल्यास दोन ते तीन वर्षे घेता येते. असे करत असताना दुस-या वर्षी ज्वारीच्या ओळींवर क्षेत्रावर तुरीच्या ओळी पेरल्या जातील याची दक्षता घेणे जरूरीचे असते.
अल्पभूधारक शेतक-यांसाठी ज्वारी + तूर ही आंतरपीक पध्दती जास्त फायदेशीर आहे. रासायनिक खताच्या मात्रेत, 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व गरज असल्यास 40 किलो पालाश पेरतेवेळी जमिनीत पेरावे. पेरणीनंतर एक महिन्याचे नत्राचा दुसरा हप्ता 40 किलो प्रती हेक्टरी फक्त ज्वारीच्या ओळीला देण्यात यावा. या आंतरपीक पध्दतीत निव्वळ ज्वारीच्या तुलनेत हेक्टरी 3 ते 4 हजार रु. जास्त मिळतात.

2. बाजरी + तूर :

कमी पावसाचा भाग आणि मध्यम जमिनीसाठी या आंतरपीक पध्दतीची शिफासर करण्यात आलेली आहे. बाजरी आणि तूर या पिकाचे ओळीचे प्रमाण 3 :3 ठेवावे ही आंतरपीक पध्दती उशिरा पेरणीसाठी सुध्दा फायदेशीर आढळून आलेली आहे. रासायनिक खताच्या मात्रेमध्ये 30 किलो नत्र व 30 किलो स्फुरद पेरते वेळी द्यावे आणि राहिलेली नत्राची 30 किलो मात्रा पेरणीनंतर 1 महिन्यांनी युरीयाद्वारे कोळप्याच्या मागे सरत्याने पेरावे. या आंतरपीक पध्दतीमुळे निव्वळ बाजरीच्या तुलनेत 2 ते 3 हजार रु. प्रति हेक्टरी जास्त मिळतात.

3. कापूस + उडीद :

ही आंतरपीक पध्दती हमखास पावसाचा प्रदेश आणि मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस करण्यात आली आहे. कापसाचे अमेरिकन तसेच देशी वाणाबरोबर उडिदाचे आंतरपीक घेता येते. अमेरिकन संकरित आणि सरळ वाणासाठी 90 x 90 व 90 x 60 सें.मी. असे अंतर ठेऊन कापसाच्या 2 ओळीमध्ये उडदाची एक ओळ पेरुन कापूस आणि उडदाचे 1:1 असे ओळीचे प्रमाण ठेवावे. कापसाच्या देशीवणासाठी दोन ओळीमध्ये 60 सें.मी. अतंर ठेऊन यामध्ये एक ओळ उडदाची पेरावी. रासायनिक खताच्या नियोजनात कापसाची शिफारस केलेली पूर्ण मात्रा, यामध्ये 25 टक्के आंतरपिकांची खताची मात्रा मिळवून ही पूर्ण मात्रा मापूस + उडीद या आंतरपिक पध्दतीसाठी वापरावी. अमेरिकन कापसाठी 40 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद तसेच उडदाची 25टक्के मात्रा मिसळून ही पूर्ण एकत्रित मात्रा पेरते वेळी द्यावी. राहिलेली अर्धी नत्राची मात्रा उडिदाचे पीक निघाल्यानंतर कापसास बांगडी पध्दतीने देण्यात यावी. उडिदा सारखेच मुगाचे आंतरपीक कापसामध्ये घेण्याची शिफारस करण्यात आलेली आह.

4. कापुस + सोयाबीन :

सोयाबीनचे क्षेत्र सतत मोठया प्रमाणात वाढत आहे. सोयाबीन हे एक शेतक-यांसाठी नगदी पीक असल्यामुळे हे पीक माठया प्रमाणत घेण्यास शेतकरी उत्सुक आहेत. आंतरपी म्हणून सुध्दा हे पीक कापसामध्ये घेता येते. कापूस व सोयाबीन हे 1:1 ओळीच्या प्रमाणत पेरावे. सोयाबीनची लवकर येणारी अथवा एमएयूएस -71 या जाती आंतपिकासाठी निवडाव्या. उशीरा पक्क होणा-या सोयाबीन जाती आंतरपिकासाठी निवडू नयेत. सोयाबीन जलद वाढ असणारे पीक असून खादाड आहे. त्यामुळे खताच्या नियोजनात शिफारस केलेली खताची 8 टक्के मात्रा कापसाच्या आळीस द्यावी. त्यामुळे पिकाचा विपरीत परिणम कापसावर न होता कापसाची वाढ सुध्दा चांगल्या प्रकारे होते. या आंतरपीक पध्दतीपासून निव्वळ कापसाच्या तुलनेत प्रति हेक्टरी 3 ते 4 हजार जास्त नफा मिळतो. ही आंतरपीक पध्दती शक्यतो भारी जमिनीवर आणि ज्या ठिकाणी थाडा सखल भाग आहे अशा भागात द्यावी.
उडीद आणि सोयाबीन ही पिके कापसामध्ये आंतरपिके घेत असताना माथ्यावरील अथवा सपाट जमिनीवर शक्यतोवर उडिदाचे पीक घ्यावे. तसेच सखल भागात सोयाबीनच्या पिकाला प्राधान्य द्यावे.

5. कापूस + तूर :

ही एक पारंपारीक पट्टापध्दती आहे. यामध्ये वेगवेगळया भागात शेतकरी कापसाच्या विशिष्ट आळीनंतर ातूरीच्या एक अथवा दोन ओळी पेरतात. या आंतरपीक पध्दतीचा कापूस संशोधन केंद्रात शास्त्रोक्त पध्दतीने अभ्यास करुन कापसाच्या 6 ते किंवा 8 ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरावी अशी शिफारस करण्यात आली आहे.

6. सोयाबीन + तूर :

सोयाबन + तूर या आंतरपीक पध्दतीत दोन्ही पिके कडधान्य वर्गातील असून पैसा देणारी पिके म्हणून यांचा समावेश होतो. या आंतरपिक पध्दतीची शिफारस मध्यम ते भारी जमिनीसाठी करण्यात ओलेली आहे. सोयाबीन आणि तूर या पिकाच्या ओळीचे प्रमाण 4: 2 असे ठेवावे. उशिरा पेरणीसाठी सुध्दा या आंतरपिक पध्दतीची शिफारस करण्यात आलेली आहे. रासायनिक खताच्या व्यवस्थापनात 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 30 किलो पालाश प्रति हेक्टरी पेरतेवेळी जमिनीत पेरावी. सर्व साधारणपणे रु. 25000 ते रु. 3000 प्रति हेक्टरी नफा या आंतरपीक पध्दतीपासून निव्वळ कपासीच्या तुलनेत जास्त मिळतो.

वरील सर्व प्रमुख आंतरपीक पध्दती शिवाय कोरडवाहू परिस्थितीत एरंडी व सोयाबीन (1:1 ) ओळीचे प्रमाण आणि हलक्या जमिनीसाठी एरंडी + तीळ या आंतरपीक पध्दतीची सुध्दा शिफारस करण्यात आलेली आहे. रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी + करडी (6:3) या आंतरपीक पध्दतीची शिफारस करण्यात आली आहे.