ग्राम कृषि संजीवनी समितीच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या

  • १. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांचे सविस्तर प्रकल्प नियोजन करुन प्रकल्प आराखडे तयार करण्यास प्रकल्प यंत्रणा व कृषि विभागास सहाय्य करणे.

  • २. ग्राम कृषि संजीवनी समितीच्या सभा आवश्यकतेनुसार नियमितपणे आयोजित करुन सभेतील निर्णयांच्या अनुषंगाने कार्यवाहीचा पाठपूरावा व समन्वय करणे.

  • ३. गावनिहाय सहभागीय सुक्ष्मनियोजन आराखडयास व सविस्तर प्रकल्प आराखडयास ग्रामसभेची मान्यता घेणे.

  • ४. मंजूर वार्षिक कृती आराखडयानुसार घटकांची व कामांची अमंलबजावणी करणे.

  • ५. प्रकल्पाचा लाभ लहान, सिमान्तिक शेतकरी, अनुसुचित जाती/अनुसुचित जमातीतील शेतकरी व महिला शेतकऱ्यांना मिळण्याच्या उद्देशाने प्रकल्पाच्या मार्गदर्शक सुचनानूसार पात्र शेतकऱ्यांची संबंधित घटकाच्या लाभासाठी निवड करणे.

  • ६. निवडलेल्या शेतकऱ्यांना संबंधित घटकांचे निकष समजावून आवश्यक तेथे लाभार्थी हिस्सा जमा करण्यास प्रवृत्त करणे व या प्रयोजनार्थ गरजेनुसार पात्र शेतकऱ्यांना स्थानिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आणि घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करण्यास लाभार्थ्यांना प्रोत्साहित करणे.

  • ७. सामायिक जमिनीवर मृदसंधारण, जलसंधारण, वृक्षलागवड इ. कामे तांत्रिकदृष्टया परिपूर्णपणे करुन घेणे व झालेल्या कामांची देखभाल- दुरुस्ती करणे.

  • ८. हवामानातील आकस्मिक बदलांमुळे निर्माण होणाऱ्या विपरीत/आपत्कालीन पीक आराखडा तयार करणे व अशी परिस्थिती उद्भवल्यास आराखडयाची अमंलबजावणी करणे.

  • ९. समितीस वितरीत निधीतून वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रकल्पाची कामे करणे.

  • १०. प्रकल्पांतर्गत केल्या जाणाऱ्या कामांच्या नोंदी करणे व संपूर्ण अभिलेख ग्रामपंचायत कार्यालयात जतन करणे.

  • ११. सामायिक कामे पूर्ण झाल्यानंतर गरजेनुसार वरिष्ठ कार्यालयाकडे निधीची मागणी करणे.

  • १२. प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या व पूर्ण करण्यात आलेल्या सर्व बाबींचे सामाजिक लेखा परिक्षण करणे.

  • १३. प्रकल्पांतर्गत झालेल्या कामांचा तपशील व खर्च ग्रामसभेसमोर सादर करणे.

  • १४. समितीच्या कामकाजाचे वार्षिक विवरण स्वतंत्रपणे ठेवणे.

  • १५. प्रकल्प क्षेत्रामध्ये प्रकल्पातील घटकांच्या अमंलबजावणीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना उपभोक्ता गट निर्माण करुन त्यांना प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या सर्व मत्ताच्या जबाबदारीने वापरासाठी व देखभालीसाठी प्रवृत्त करणे.

  • १६. गावातील शेती विषयक गरजा भागविण्यासाठी सदर प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीबरोबरच कृषि व संलग्न विभागाच्या वेगवेगळया योजनांशी सांगड घालण्यासाठी समन्वय साधणे.

  • १७. ग्राम कृषि संजीवनी समितीचे आर्थिक व्यवहार व प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समितीचे अध्यक्ष व संबंधित गावातील कृषि सहाय्यक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यात येऊन सर्व रक्कमांची प्रदाने समितीने घेतलेल्या ठरावानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करणे.

  • १८. दैनंदिन रोख पुस्तिका ठेवणे व दर महिन्याला त्याचा ताळमेळ घेण्याची जबाबदारी कृषि सहाय्यकावर राहील. लेखा परिक्षणाचे वेळी अभिलेख दाखविण्याची जबाबदारी कृषि सहाय्यक व समूह सहाय्यक यांचेवर संयुक्तपणे राहील.

  • १९. मासिक प्रगती अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणेची जबाबदारी समूह सहाय्यक यांचेवर राहील.

  • २०. ग्राम कृषि संजीवनी समितीचे सहसचिव यांनी गैरवर्तन/गैरव्यवहार केल्याचे दिसून आल्यास किंवा प्रकल्पाच्या नेमून दिलेल्या कामात कुचराई केल्यास ग्राम कृषि संजीवनी समिती कारणासह ठराव घेऊन त्यांचेवर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करु शकेल व अशाप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांची राहील.

  • २१. अनुसुचित क्षेत्रामध्ये समितीचे कार्यान्वयन पेसा कायद्यातील तरतुदीनुसार होईल.

  • २२. समितीच्या अध्यक्षांनी गैरवर्तन/गैर व्यवहार केल्याचे दिसून आल्यास ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनानुसार कारवाई करण्यात येईल.